हिंगोली : संतोष अवचार –
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या हळदीला साडे सहा हजार रुपयांचा दर मिळत होता. हा दर सात हजाराच्या वर सरकतच नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती. यासंदर्भात मार्मिक महाराष्ट्र मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मागील दोन दिवसांपासून हळदीला साडेसात हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हळदीला यापुढे चांगला दर मिळेल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी बोलताना सांगितले.
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या चांगल्या हळदीला 6901 साडेसहा हजार रुपये असा दर मिळत होता. हळदीला चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या लागवड खर्चही हाताशी लागत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसत होता. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य दर मिळत नसल्याने बी-बियाणे व खते खरेदी करावेत कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता. त्यामुळे बाजारपेठेतील हळदीची आवकही घटली होती. यासंदर्भात मार्मिक महाराष्ट्रने वृत्त प्रकाशित करताच 15 जून रोजी हिंगोलीच्या बाजारपेठेत हळदीला 6450 रुपयांपासून 7020 रुपये तर चांगल्या हळदीला सात हजार 590 रुपयांचा दर मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी हा दर पाच हजार 900 रुपयांपासून सहा हजार 475 रुपये, सात हजार पन्नास रुपये असा होता. मार्मिक महाराष्ट्रमध्ये वृत्त झळकताच दोनच दिवसात हळदीचे दर साडेसात हजार रुपयांवर गेले आहे .17 जून रोजी हळदीला सहा हजार दोनशे रुपयांपासून 6750 रुपये तर चांगल्या हळदीला 7300 रुपयांचा दर मिळाला. यापुढेही हळदीला चांगला दर मिळेल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी मार्मिक महाराष्ट्र शी बोलताना सांगितले.