हिंगोली : संतोष अवचार /-
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांच्या दालनात ठिय्या दिला. विद्यार्थ्यांनीच आपल्या भविष्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेची ही शाळा माध्यमिक विद्यालय म्हणून ओळखली जाते. या विद्यालयात आज गावासह परिसरातील गावचे विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येत असतात. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात आवश्यक विद्यार्थी असायला हवेत, मात्र या शाळेत केवळ पाच शिक्षक असल्याची माहिती पालकांनी दिली. पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना आलेख विषयांचा अभ्यास करताना अडचण निर्माण होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांनी शाळेला तात्काळ शिक्षक मिळावेत म्हणून 20 जून रोजी सकाळीच जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांची उपस्थिती होती. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात भरवलेल्या शाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतात की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.