हिंगोली : संतोष अवचार –
शेतकऱ्यांचा शेतमाल व विद्युत मोटारी चोरणारी तरुणांची टोळी पकडण्यात गोरेगाव पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या पाच आरोपींकडून 26 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हिंगोली जिल्ह्यात विशेषता वाशिम जिल्हा लगत असलेले गोरेगाव, सेनगाव व नरसी नामदेव या पोलिस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांचा शेतमाल व शेतातील विद्युत मोटारी चोरीच्या घटना घडल्या होत्या.
याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते नमूद चोरीच्या घटनांना आळा घालून चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्याचे आदेश हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिस ठाण्याला दिल्या होत्या. त्या बाबत गोपनीय बातमीदार व तंत्रशुद्ध पद्धतीने नमूद गुन्हे करणारे टोळीचा शोध सुरू होता. गोरेगाव पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना चोरीच्या उद्देशाने मनास पिंपरी परिसरात संशयास्पदरीत्या वावरताना आरोपी दीपक विश्वनाथ सोमटकर (वय 20 वर्ष राहणार दोडकी तालुका जिल्हा वाशिम), प्रज्वल राजू कव्हर (19 रा. तामसी तालुका जिल्हा वाशिम), अजय गजानन वाकुडकर (वय 18 राहणार गिरा तालुका जिल्हा वाशिम), मुकुंद अशोक श्रीमेवार वय (20 वर्ष राहणार दत्तनगर अकोला नाका वाशीम) व स्वामी विश्वनाथ साबळे (वय 18 वर्षे राहणार तामसी तालुका जिल्हा वाशिम) मिळून आले. नमूद युवकांना ताब्यात घेऊन गोरेगाव पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या विचारपूस व त्यांच्याकडे तपास केला असता आरोपींनी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव, सेनगाव व नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीत विविध गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून तपासादरम्यान नमूद गुन्ह्यातील शेतमाल व मोटार विकून मिळवलेले रक्कम नगदी एक लाख 15 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली एक एरटिगा वाहन किंमत दहा लाख रुपये व 2 स्विफ्ट डिझायर वाहन किंमत 15 लाख रुपये असा एकूण 26 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडे पोलीस अधिकारी तपास करत आहे.
ही कारवाई हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार राहुल गोटरे, पोलीस हवालदार सुनील अंभोरे, पोलीस नाईक राहुल मैयंदकर, पोलीस नाईक काशिनाथ शिंदे, पोलीस नाईक राजू ठाकूर, नितीन गोरे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सावळे, तुषार ठाकरे, महाराष्ट्र पोलीस शिपाई रवीनाथ गुमनर सर्व अंमलदार पोलीस स्टेशन गोरेगाव व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.