हिंगोली : संतोष अवचार –
तालुक्यातील नरसी येथील संत नामदेव महाराजांची पालखी एकोणावीस जून रोजी हिंगोली येथे आली असता शहरातील नागरिकांनी व प्रशासनाच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.संत श्रेष्ठ संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा हिंगोली येथे 19 जून रोजी दाखल झाला. यावेळी शहरातील नागरिकांनी व प्रशासनाने या पालखीचे मोठ्या जल्लोषात व भक्तिभावात स्वागत केले.
यावेळी शिवसेनेचे भावी नगरसेवक सुभाष बांगर, माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी वाखारे यांच्यासह पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. covid-19 नंतर पहिल्यांदाच संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघाला असून 27 वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. हिंगोली येथील रामलीला मैदानावर पालखीचे रिंगण झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे रिंगण सुरूच होते. हा पालखी सोहळा हिंगोली येथे मुक्कामी असून सकाळी हा सोहळा श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होणार आहे. पालखीचा मुक्काम नगरपरिषदेच्या कल्याण मंडपम येथे आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखी च्या दर्शनासाठी शहरातील व परिसरातील नागरिकांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत रामलीला मैदानावर येत होते.