तालुक्यातील विभागीय स्तरावर आदर्श गाव म्हणून नावलौकिकास आलेल्या दाटेगाव येथे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी 15 जून रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची तपासणी करून मुलांना गणवेशाचे वाटप केले.
हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने विभागीय स्तरावर आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार प्राप्त केला आहे. गावाची घोड- दौड आता राज्यस्तरावर आदर्श गाव म्हणून लौकिक पावण्याकडे असून या गावास आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केलेली आहे. विभागीय आयुक्तांनी ही ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे कौतुक केलेले आहे. 15 जून रोजी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दाटेगाव येथे भेट देऊन जिल्हा परिषदेच्या शाळेची तपासणी केली यावेळी ते शाळेची स्वच्छता व टापटीपपणा तसेच गुणवत्ता पाहून भारावून गेले. एकंदरीत त्यांनी शाळेचा परिसर, साफ सफाई, शालेय रंगरंगोटी पाहून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जाधव, शिक्षक येलारे गायकवाड, शिक्षणप्रेमी ज्ञानेश्वर पारवे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.