मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील वाहतूक शाखेने 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत वाहतूक नियम मोडणाऱ्या एकूण 2161 वाहनांवर कारवाई करत 19 लाख 21 हजार 250 रुपये इतका दंड आकारला आहे.
5 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान हिंगोली शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या 1764 वाहनांवर कार्यवाही करून एकूण 11 लाख 43 हजार 250 रुपये दंड व अति वेगाने वाहन चालविणाऱ्या 397 वाहनांवर सात लाख 78 हजार रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा एकूण 2161 वाहनांवर कारवाई करत 19 लाख 21 हजार 250 रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.
हिंगोली शहर वाहतूक शाखेमार्फत शहरातील प्रत्येक चौकात पोलीस अंमलदार वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून वेळोवेळी वयोवृद्ध तसेच अपंग व्यक्तींना रस्ता ओलांडण्यास मदत करतात.
वरील कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा हिंगोली चे पोलीस निरीक्षक ए. आय. सय्यद व वाहतूक शाखेचे सर्व पोलिस अंमलदार यांनी केली.
वाहनधारकांनी मोटार वाहन कायद्याचे पालन करावे, तसेच पालकांनी त्यांच्या 16 वर्षातील मुला-मुलींना वाहन चालविण्यास देऊ नये अन्यथा तडजोड शुल्क 5 हजार रुपये व दुसऱ्या वेळेस न्यायालयात पालकांविरुद्ध खटला दाखल होऊन पालकांना 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होईल. त्याचप्रमाणे हिंगोली शहरात नो पार्किंग झोन मध्ये वाहन उभे करू नये, विरुद्ध दिशेने वाहन चालू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, असे आवाहन करत जे वाहन चालक मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.