मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविली जात आहे. यावेळी एकूण 27 लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हिंगोली पोलिसांनी सन्मानपूर्वक फिर्यादीस परत केला आहे.
हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर मोहीम राबविण्याबाबत सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या.
या अनुषंगाने 31 जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर गुन्ह्यात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहिमे दरम्यान जिल्ह्यातील एकूण तीन गुन्ह्यातील ज्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने किंमत एक लाख 90 हजार 200 रुपये, 10 वाहने किंमत 22 लाख 65 हजार रुपये, 26 मोबाईल फोन किंमत तीन लाख 22 हजार रुपये व इतर मुद्देमाल किंमत 19 हजार रुपये, असा एकूण 27 लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस परत करण्यात आला.
डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून आजपर्यंत अशाच प्रकारची मोहीम राबवून एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून एकूण 56 लाख 57 हजार 12 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस हवलदार सुनील अंभोरे, पोलीस शिपाई किशोर सावंत व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याचे मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली.
भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येणार आहे.