मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – न्यायालयाने समन्स देऊ नाही व वारांत निघूनही मागील अनेक दिवसांपासून न्यायालयात हजर न राहणाऱ्या खरबी येथील 4 जण व भाटेगाव येथील एकास तसेच इंचा येथील एकास पकडून त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांच्या आदेशाने यापुढे आठवड्यातून चार दिवस कोंबिंग ऑपरेशन राबविले जाणार आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. तसेच अवैध धंद्यांवरही कठोर कारवाई केली जात असल्याने या क्षेत्रातील व्यक्तित मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कार्यवाही तसेच सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी व प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही बाबत विशेष मोहीम सुरू असून त्याचाच भाग म्हणून गुन्हेगारांची नियमित तपासणी व कार्यवाही यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आठवड्यातून चार दिवस गुन्हेगार वस्ती संवेदनशील ठिकाणी तसेच सराईत गुन्हेगार यांच्याबाबत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून कार्यवाही करण्यात येणार आहे.
4 नोव्हेंबर रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण विवेकानंद वाखारे यांच्या नेतृत्वात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खरेदी व परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
सदर ऑपरेशन मध्ये रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासून विशेष कामगिरीत तुळशीराम तान्या चव्हाण (वय 40 वर्ष) राहणार इंचा, लक्ष्मण माणिक पवार (वय 35 वर्ष) खेतऱ्या माणिक पवार (वय 45 वर्ष), पांडुरंग मछल्या पवार (वय 30 वर्ष), मंगल भुराजी काळे (वय 35 वर्ष) (सर्व राहणार खरबी) व भाटेगाव येथील परमेश्वर पवार यांना न्यायालयाकडून समन्स व वॉरंट निघूनही मागील अनेक दिवसांपासून न्यायालयात हजर न झाल्याने त्यांचा पोलीस शोध घेत होते. या सहा जणांना अटक वॉरंट यांची तालीम करून सदरील इसमांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले.
या कोंबिंग ऑपरेशन कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण विवेकानंद वाखारे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्यासह हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे नरसी नामदेव पोलीस ठाणे व गोरेगाव पोलीस ठाणे येथील 20 अंमलदार सहभागी होते.