मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदार संघात शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 63.54 टक्के मतदारांनी मतदान केले, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 62.54, हदगाव 65.53, हिंगोली 59.92, कळमनुरी 63.60, किनवट 65.86 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात 64.37 टक्के मतदान झाले आहे.
ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक एम. एस. अर्चना, खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) आर. जयंथी आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली.
यामध्ये विधानसभानिहाय एकूण मतदार आणि झालेले मतदान याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
82-उमरखेड विधानसभा मतदारसंघात 1 लाख 96 हजार 728 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 1 लाख 5 हजार 984 पुरुष, 90 हजार 743 महिला तर एका तृतीयपंथी मतदारामध्ये समावेश आहे. 83-किनवट विधानसभा मतदार संघात 1 लाख 77 हजार 258 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 93 हजार 655 पुरुष, 83 हजार 601 महिला, तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 84-हदगाव विधानसभा मतदार संघात 1 लाख 90 हजार 338 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 2 हजार 997 पुरुष, 87 हजार 338 महिला आणि 3 तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.
तर हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा विधानसभा मतदार संघनिहाय तपशीलपुढीलप्रमाणे आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 94 हजार 89 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 7 हजार 691 पुरुष, 86 हजार 397 महिला तर एका तृतीयपंथी मतदाराने आपल्या मताचे दान उमेदवाराच्या पारड्यात टाकले. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 2 हजार 845 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 11 हजार 196 पुरुष, 91 हजार 648 महिला व एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे.
तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असून त्यामध्ये 1 लाख 93 हजार 700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 6 हजार 781 पुरुष, 86 हजार 918 महिला आणि एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या 18 लाख 17 हजार 734 मतदारांपैकी 11 लाख 54 हजार 955 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 6 लाख 28 हजार 302 पुरुष, 5 लाख 26 हजार 644 महिला आणि 9 तृतीयपंथी मतदारांने मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदानाची एकूण टक्केवारी पाहता 83-किनवट विधानसभा मतदार संघ (65.86 टक्के) अव्वलस्थानी राहिला असून हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान (59.92 टक्के) सर्वात कमी राहिले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात 25 तृतीयपंथी मतदारांपैकी 9 जणांनी या राष्ट्रीय कर्तव्यात आपला सहभाग नोंदवला.
किनवट विधानसभा मतदारसंघाच्या सहायक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी कावली मेघना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी, क्रांती डोंबे, डॉ. सचिन खल्लाळ, डॉ. सखाराम मुळे, अविनाश कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश महाडीक, समाधान घुटूकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुखांनी प्रयत्न केले.