हिंगोली जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलांची परिस्थिती औरंगाबाद व जालना जिल्ह्याप्रमाणेच आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी कळमनुरी येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झालेले आहे. वसमत, औंढा नागनाथ क्रीडा संकुलांचे काम रखडलेले आहे.
हिंगोली जिल्ह्यात पाच तालुक्यांचा समावेश आहे. पाच तालुका क्रीडा संकुलांपैकी एकाच तालुक्यात क्रीडा संकुलाचे सर्व काम पूर्ण करण्यात आलेले आहे. कळमनुरी शहरातील कै. शंकरराव सातव महाविद्यालयाने तालुका क्रीडा संकुलासाठी एक हेक्टर जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी क्रीडा विभाग व महाविद्यालयात सामंजस्य करार झालेला आहे. त्यानूसार क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. क्रीडा संकुलासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाल्यानंतर क्रीडा संकुलाचे सर्व काम पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीत संकुलाचा वापर होत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितले.
वसमत येथील हुतात्मा बहिरजी स्मारक शैक्षणिक संस्थेच्या दोन एकर जागेवर तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. त्यासाठी क्रीडा विभाग व महाविद्यालयात सामंजस्य करार करण्यात आला आहे. एक कोटी निधीतून आत्तापर्यंत दोनशे मीटरचा धावण्याचा ट्रॅक, विविध खेळांची मैदाने, इनडोअर हॉल, बॅडमिंटन कोर्ट अशी कामे करण्यात आलेली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
औंढा नागनाथ येथील सर्व्हे क्रमांक १८६ मधील दोन हेक्टर जागा तालुका क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. एक कोटी निधी प्राप्त झाल्यानंतर दोनशे मीटरचा धावण्याचा ट्रॅक, विविध खेळांची मैदाने, बास्केटबॉल कोर्ट, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते आदी कामे आत्तापर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहेत. निधी अभावी बॅडमिंटन हॉलचे काम बंद आहे.
हिंगोली तालुका क्रीडा संकुलासाठी गट क्रमांक १०२ व ६१ मधील १.७८ हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच सेनगाव येथे तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी अद्यापपर्यत जागा उपलब्ध झालेली नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितले.