Marmik
Hingoli live

‘शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणी करू नये’

हिंगोली संतोष अवचार

 सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यात केवळ 54 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. तो पेरणीयोग्य नसल्याने किमान 100 मि.मी. पाऊस होईपर्यंत व जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओल उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.             

खरीप हंगाम 2022 मध्ये 3 लाख 53 हजार 624 हेक्टर प्रस्तावित पेरणी क्षेत्रासाठी आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात 55 हजार 403 मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी 34 हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची विक्री झाली असून आज रोजी जिल्ह्यात 25 हजार 361 मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे.             

शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खताची मागणी करु नये. त्यातही विशिष्ट उत्पादकांच्या डीएपीसाठी आग्रह धरु नये. वास्तविक पाहता सर्व कंपन्यांच्या डीएपी मध्ये 18 टक्के नत्र व 46 टक्के स्फूरद हेच घटक उपलब्ध असतात.            

  सोयाबीन पिकांसाठी एनपीकेएस 20:20:00:13 या ग्रेडचे खत अतिशय उपयुक्त आहे. कारण त्यामध्ये सोयाबीन बियाणांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेले सल्फर 13 टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी ऐवजी एनपीकेएस  20:20:00:13 या ग्रेडच्या खताचा सोयाबीनसाठी वापर करावा. तसेच युरिया + एसएसपी या दोन ग्रेडची खते डीएपी खताला उत्तम पर्याय असून त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. तसेच एसएसपी मध्ये सल्फर असल्याने सोयाबीन बियाणातील तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे या खताचा वापर सोयाबीन या पिकासाठी शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.             

शेतकऱ्यांच्या बियाणे व रासायनिक खतांच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर 01 व तालुका स्तरावर 05 अशा एकूण 06 तक्रार निवारण कक्षांमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. रासायनिक खत विक्रेते शेतकऱ्यांना विविध ग्रेडच्या खतासोबत इतर उत्पादनांची खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या  जिल्ह्यातील 04 रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.               

जिल्हास्तरावर कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याचा भ्रमणध्वनी क्र. 9421490222 असा आहे. तर तालुकास्तरावर कृषि विभाग, पंचायत समिती, औंढा नागनाथ (भ्रमणध्वनी क्रमांक 8087889299), कृषि विभाग, पंचायत समिती, वसमत (भ्रमणध्वनी क्र. 9028905357), कृषि विभाग, पंचायत समिती, हिंगोली (भ्रमणध्वनी क्र. 9822699947), कृषि विभाग, पंचायत समिती , कळमनुरी (भ्रमणध्वनी क्र. 9673946799), कृषि विभाग, पंचायत समिती, सेनगाव (भ्रमणध्वनी क्र.9158121718) येथे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.             

या व्यतिरिक्त शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली व पाचही तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयातही तक्रार दाखल करु शकतात.             

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व रासायनिक खत विक्री केंद्रावर शिल्लक असलेला रासायनिक खतांचा ग्रेडनिहाय साठा याबाबत माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर https://hingoli.nic.in/notice_category/agriculture-department/ या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी दिली आहे. 

Related posts

विकसित भारत संकल्प यात्रा: शासनाच्या विविध योजनांचा लाभ वंचित असलेल्या सर्व घटकापर्यंत पोहोचवावेत- कौस्तुभ गिरी

Santosh Awchar

हिंगोली पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; तडीपरीचे आदेश झुगारून वावरणाऱ्या दोघांना पकडले

Santosh Awchar

रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भुमरे हिंगोली दौऱ्यावर

Santosh Awchar

Leave a Comment