सेनगाव : जगन वाढेकर /-
यंदा मृग नक्षत्रातील पावसाने ओढ दिल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. सेनगाव तालुक्यात तर अवघ्या एक हजार 168 इतर जमीन क्षेत्रावर पेरणी झाली असून 92 हजार हेक्टर क्षेत्र पेरणी विना आहे. पावसाच्या विलंबाचा खरीप हंगामात मोठा फटका बसला असून जून महिना अर्ध्यावर संपला तरी खरीप हंगामातील पेरण्या पावसाविना खोळंबल्या आहेत.
यंदा मृग नक्षत्र लागून आठ ते दहा दिवस झाले तरी समाधानकारक पाऊस पडलेला नाही जिल्ह्यात अवघा 56 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद असून या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी पुनर पेरणीचा धोका पत्करून खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्या केल्याचे दिसते. अत्यल्प पावसावर झालेल्या ह्या पेरण्या किती काळ टिकतील व पिके जगतील या चिंतेत शेतकरी आहेत. दुबार पेरणीचे संकट ओढवू नये अशी भीतीही व्यक्त होत आहे.
पावसाच्या विलंबाने सेनगाव तालुक्यातील 91 हजार हेक्टर क्षेत्र पेरणी विना असून अवघ्या 1168 हेक्टर जमिनीवर खरिपातील विविध पिकांच्या पेरण्या झाल्याचा अहवाल कृषी विभागाकडून प्राप्त झाला आहे. यामध्ये गोरेगाव मंडळात 400 हेक्टर जमिनीवर सोयाबीन, 80 हेक्टर जमिनीवर हळद, 30 हेक्टर जमिनीवर तूर, तीन हेक्टर जमिनीवर मूग, पाच हेक्टर जमिनीवर उडीद या पिकाची पेरणी झाली आहे. तर साखरा मंडळात एकशे पाच हेक्टर जमिनीवर सोयाबीन, 130 हेक्टर जमिनीवर हळद, 20 हेक्टर जमिनीवर तूर या पिकांची पेरणी झाली आहे. सेनगाव मंडळात तीनशे हेक्टर जमिनीवर सोयाबीन, 130 हेक्टर जमिनीवर हळद, 20 हेक्टर जमिनीवर तुर, तीन हेक्टर जमिनीवर मूग, दोन हेक्टर जमिनीवर उडीद या पिकाची पेरणी झाली आहे. अशा एकत्रित 1168 हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी झाली असून मूग व उडदाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसते. समाधानकारक पाऊस अद्यापही झाला नसल्याने तालुका भरातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.