हिंगोली, सेनगाव : संतोष आवचार, जगन वाढेकर, पांडुरंग कोटकर
जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे व नागरिक तसेच वाहन चालकांमध्ये वाहतुकीचे नियम व सुरक्षा बाबत जनजागृती व्हावी या व्यापक हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जून ते 28 जून या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. त्या कार्यक्रमांतर्गत 24 जून रोजी प्रवासासाठी आवश्यक वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबविण्यात आली असून हा जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.
या रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहांतर्गत जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांनी 23 जून रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑटो व ट्रक चालकांच्या बैठका घेऊन त्यांना वाहतूक नियम व सुरक्षा याबाबत सखोल मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच मार्गदर्शक माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक ठेंगे पोलिस स्टाफ व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांचा स्टाफ असे मिळून हिंगोली ते सेनगाव मार्गावर पानकनेरगाव पॉईंट, नरसी स्टॅन्ड, पुसेगाव टी पॉईंट, येवले शाळा सेनगाव, विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा, तोषनीवाल विद्यालय या ठिकाणी रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियमन बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जनजागृतीसाठी पोलीस विभागाकडून तयार केलेले चार शॉर्ट फिल्म चे प्रसारणही केले. 24 जून रोजी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हिंगोली शहरात शहर पोलीस ठाणे यांनी एनसीसी विद्यार्थी यांच्यासह शहरातील प्रमुख चौकांमध्ये व रहदारीचा मुख्य ठिकाणी एनसीसी विद्यार्थ्यांच्या हातात हेल्मेटचा नेहमी वापर करावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, संयम पाळा अपघात टाळा, असे विविध आकर्षक संदेश असणारे फलक घेऊन विद्यार्थी उभे होते. हे विद्यार्थी नागरिक व वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत होते.
रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह वेळापत्रकाप्रमाणे आज रोजी वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची कारवाई होती. सुरक्षित प्रवासासाठी वाहनांवर आवश्यक तेथे रिफ्लेक्टर असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन कडून मोठ्या प्रमाणात मुख्य महामार्ग व रहदारीचा रस्त्यावरील वाहनांवर आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर लावण्याची कार्यवाही करण्यात आली. वाहनांवर रिफ्लेक्टर लावून पोलिसांनी सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.