हिंगोली : संतोष अवचार
जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व नागरिक तसेच वाहन चालकांमध्ये वाहतुकीचे नियम व सुरक्षा बाबत जनजागृती व्हावी या व्यापक हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 28 जून या दरम्यान जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानाच्या चौथ्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांनी रस्ते सुरक्षा वाहतूक नियमांबाबत विस्तृत माहिती देणारे जवळपास 30 हजार माहिती पत्रकांचे वाहनधारक व चालकांमध्ये वाटप केले.
तसेच जनजागृतीसाठी चार शॉर्ट फिल्म चे हि प्रसारण करण्यात आले. या सप्ताहांतर्गत 22 जून रोजी जनजागृतीपर मोटर सायकल रॅली 23 जून रोजी ऑटो व ट्रक चालकांच्या बैठका घेण्यात आल्या. 24 जून रोजी सुरक्षित प्रवासासाठी वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबविण्यात आली तर 25 जून रोजी जिल्ह्यात नियमित प्रवासी व इतर वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर व्यापक प्रमाणात घेण्यात आले.
अभियानाच्या चौथ्या दिवशी 26 जून रोजी रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यातील पोलिस ठाणे अंतर्गत महत्त्वाचे वाहतुकीचे चौक, बाजारपेठ व प्रवासी वाहन थांबण्याच्या पॉईंटवर पोलिसांतर्फे वाहनचालकांना जागेवर जाऊन सुरक्षित वाहन चालविणे, तसेच वाहतूक नियम व कायदे वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता, वाहन चालकाचे कर्तव्य आदींबाबत सविस्तर व सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित वाहनचालकांना सविस्तर मार्गदर्शन करुन व सूचना असणारे माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.