हिंगोली : संतोष अवचार
सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2022-23 च्या खरीप पीक कर्जाचे जास्तीत जास्त वाटप करुन खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक शशीकांत सांवत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक विलास जगताप, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कादरी, आरबीआयचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी नवसारे, विविध बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट केवळ 36.09 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नुतनीकरणाचे व नवीन अर्ज भरुन घ्यावेत.
आपणास देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. तसेच विविध योजनेचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत. ज्या बँका पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.