सेनगाव : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील खुडज येथे 2 जुलै रोजी वन सप्ताह अंतर्गत हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी बी. एच. कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
सेनगाव तालुक्यातील आतापर्यंतचे पर्जन्यमान हे समाधान कारक नाही. वातावरणात झालेल्या बदल तसेच पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लावणे ही काळाची गरज आहे. सदरील बाब ओळखून शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. सेनगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या वतीने 1 ते 7 जुलै या दरम्यान वन सप्ताह राबविला जात असून या सप्ताहांतर्गत तालुक्यातील खुडज येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी खुडज गावचे सरपंच मंगेश टाले, सेनगाव येथील वन विभागाचे वनपाल एस. एस. चव्हाण, सेनगाव पंचायत समितीचे माजी सदस्य पिंटू गुजर यांच्यासह मुख्याध्यापक आर. टी. जाधव, माजी सरपंच महादेव पहेलवान, ग्रामपंचायत सदस्य माधव टाले, सागर राहाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सेनगावचे वनरक्षक एस. जे. शिंदे, संतोष इटकर, सुरज उबाळे, नामदेव नायकवाल, हनुमान झाडे यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.