Marmik
Hingoli live Love हिंगोली News महाराष्ट्र

हिंगोलीत येणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह जिल्हाभरात मद्यविक्रीचा महापूर!

हिंगोली : प्रतिनिधी

शहरात येणार्‍या व शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर अनेकांनी मद्य विक्रीचा व्यवसाय ठरला आहे. यातील अनेकांकडे मद्यविक्री साठी आवश्यक असणारा परवाना नसून अनेकांनी अवैधरित्या आपली दुकाने थाटून जोमाने व्यवसाय सुरू केला आहे. याकडे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

हिंगोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट आणि बियर बारचे 136 परवानाधारक असून देशी दारू विक्रीचे 43 परवाना धारक आहेत वाईन शॉप यामध्ये देशी-विदेशी दारूचे चार परवानाधारक असून बियर शॉपी चे 43 परवानाधारक आहेत. देशी दारू चे ठोक विक्रेते चार परवानाधारक असून मळी उत्पादन आणि विक्रीचे 5 परवानाधारक आहेत. मळी विकत घेऊन वापराचे परवानाधारक दोन असल्याची माहिती हिंगोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. असे असले तरी हिंगोली शहरात आणि जिल्ह्यातील विविध शहरात तसेच राष्ट्रीय महामार्ग राज्य रस्ता तसेच काही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यालगत अनेकांनी विनापरवाना अवैधरित्या बिअर शॉपी, वाईन शॉप, देशी – विदेशी दारू विक्रीची दुकाने थाटल्याचे दिसून येते.

तसेच अनेकांनी परमिट आणि बियर बार चे ही लायसन न घेता आपला व्यवसाय ठरल्याचे दिसते. हिंगोली येथे येताना तसेच अकोला बायपास, नांदेड राष्ट्रीय महामार्ग, परभणी कडे जाणारा राज्य महामार्ग, रिसोड महामार्ग या महामार्गाला सह जिल्ह्यातील इतर रस्त्यांवरही अनेक ठिकाणी वाईन शॉपी, बियर बार ची दुकाने थाटल्याचे चे दिसते. तसेच विविध ठिकाणी अवैधरित्या देशी दारूची दुकाने व काही ठिकाणी हातभट्ट्याही चालवल्या जात असल्याचे दिसते. या सर्व प्रकाराकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करत असून या विभागाच्या या अशा दुर्लक्षाने या धंद्यात जोमाने वाढ होत असल्याचे दिसते.

जेमतेम अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

हिंगोली शहरासह जिल्ह्यात दारू विक्रीचा नित्य महापूर सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सन 2021-22 मध्ये अवैध दारू विक्री विरुद्ध 346 गुन्हे दाखल करून 256 आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईत 22 लाख 46 हजार 158 रुपयांचा मुद्देमाल व बावीस वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच माहे एप्रिल 2022 पासून जून पर्यंत अवैध दारू विक्री विरुद्ध 179 गुन्हे दाखल करण्यात आले तर 62 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत दोन लाख 93 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर तीन वाहने पकडण्यात आल्याची माहितीही हिंगोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात अवैध दारू विक्री व हातभट्टी यांचा महापूर आलेला असताना तसेच या धंद्यात येणाऱ्यांची संख्या पाहता कारवाईचे हे आकडे वरवर वाटतात.

नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही वरवरचिच कारवाई

शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या भंग प्रकरणी हिंगोली येथील उत्पादन शुल्क विभागाकडून सन 2021 – 22 मध्ये वरवरचिच कारवाई झाल्याचे दिसते. यामध्ये देशी दारू विक्री विरुद्ध 14 गुन्हे तर विदेशी दारू विक्री विरुद्ध 4 गुन्हे दाखल करण्यात आले. वाईन शॉप विरुद्ध 2 गुन्हे तर बिअर शॉप विरुद्ध एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली. शासनाच्या नियमानुसार परवानाधारकांनी वेळेचे बंधन पाळणे, रजिस्टर मेंटेन ठेवणे, स्वच्छता ठेवणे दुकानातील मालाच्या हिशोब ठेवणे, ज्यादा दराने विक्री न करणे अधिनियम घालून देण्यात आलेले आहेत. या नियमांचा भंग केल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सन 2021 – 22 मध्ये सदरील कारवाई केल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे; मात्र ही कारवाई वरवरचिच ठरल्याचे दिसते.

सात कर्मचाऱ्यांवर चालतो राज्य उत्पादन शुल्क विभाग

हिंगोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात सद्यस्थितीत केवळ सात कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कर्मचार्‍यांवरच या विभागाचा जिल्ह्याचा कारभार सुरू असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कारवाईच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. तसेच विभागास केवळ दोन वाहने असून वाहन संख्या ही नाम मात्र आहे. या विभागाचा पदभार सध्या प्रभारी वर असून परभणी येथून काम पाहिले जात असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

Related posts

जलरथास हिरवी झेंडी; जिल्हाभरात करणार जनजागृती

Gajanan Jogdand

हिंगोली येथे 10 टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई

Gajanan Jogdand

…तर सार्वजनिक गणेश मंडळांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद होईल

Gajanan Jogdand

Leave a Comment