हिंगोली : संतोष अवचार
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के गुणाने उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी-विद्यार्थिंनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यास उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
यासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दोन छायाचित्रे, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टीफिकेटसह जिल्हा व्यवस्थापकांच्या नांवे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज सादर करावा. अर्ज सादर करताना वरील सर्व मूळ कागदपत्रासह त्याच्या दोन छायांकित प्रती सोबत आणावेत.
मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी-विद्यार्थिंनी यांनी दि. 21 जुलै, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत वरील सर्व कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली पिन-431513 येथे संपर्क साधावा. उशीरा आलेल्या कागदपत्रे व अर्जाचा जिल्हा कार्यालयामार्फत स्वीकार करण्यात येणार नाही, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय,हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.