हिंगोली : संतोष अवचार :-
तालुक्यातील समगा येथून वाहणाऱ्या कयाधू नदी वरील पूल पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेला. यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हिंगोली जिल्ह्यात मागील आठ ते नऊ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहेत. पडणाऱ्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हिंगोली तालुक्यातील समगा येथून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील पूल पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेला. यामुळे समगा गावासह दहा गावांचा संपर्क तुटला असून या गावातील शेतकऱ्यांना व दूध विक्रेत्यांना आपल्याकडील दूध व भाजीपाला हिंगोली येथे आणता आला नाही. अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला असला तर दूध दही खराब झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षांपासून सदरील पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून केली जात आहे; मात्र जिल्हा प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी दरवर्षी अनेकदा हा पूल पावसाच्या पाण्याने पाण्याखाली जाऊन या भागातील गावांचा संपर्क तुटतो असेही शेतकऱ्यांनी सांगितले. पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे.