मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
बुलढाणा – जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील तीन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन त्यांचे पैसे न देता पोबारा केल्याने शेतकरी सुनील लक्ष्मणराव मोडेकर यांच्या फिर्यादीवरून चिखली येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष बाबुराव रणमोडे (वय 37 वर्ष, रा. कोडगाव, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद ह. मु. चिखली) यास उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
चिखली येथील पवित्रा ट्रेडिंग कंपनी संतोष बाबुराव मोरे (वय 45 वर्ष व्यवसाय व्यापार, एमआयडीसी चिखली ता. चिखली जि. बुलढाणा), अशोक समाधान मस्के (मु. पो. गांगलगाव ता. चिखली जि. बुलढाणा) व निलेश आत्माराम सावळे (मु. पो. गांगलगाव ता. चिखली, जि. बुलढाणा) यांनी शेतकऱ्यांकडून तूर, सोयाबीन, चना, भुईमूग, शेंगा असा शेतमाल खरेदी करुन शेतकऱ्यांनी त्यांना विकलेल्या मालाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएस द्वारे देण्यात येईल असा शेतकर्यांचा विश्वास संपादन करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून त्यांचा मोबदला न देता या तिन्ही आरोपींना नियोजितपणे कट रचून फिर्यादी शेतकर्यासह इतर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी केला. तसेच त्यांची रक्कम आरटीजीएस ने देतो अशी खोटी बतावणी करून विश्वास घात करून फिर्यादी व इतर शेतकऱ्यांची तीन कोटी 41 लाख 42 हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने बुलढाणा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक बुलढाणा 2 अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणाचे सचिन कदम, आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणाचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानि यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांच्याकडे तपास देण्यात आला. त्यांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष बाबुराव रणमोडे (रा. कोडगाव ता. परंडा जि. उस्मानाबाद, ह. मु. चिखली) याला उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे.
गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक केल्याने पवित्र ट्रेडिंग कंपनी एमआयडीसी चिखली येथे शेतमाल जादा भावाने घेण्याचे आमिष देऊन खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम अदा न करता फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा कार्यालय बुलढाणा येथे हजर राहून आपला जबाब नोंदवावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.