मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली :- घरासमोर चकरा का मारतो तसेच दारू पिण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून हट्टा गावातील लोभाजी ऊर्फ पिंटू सांगळे व त्याचा साथीदार शेख वाजिद शेख चिनू यांनी प्रभाकर ठोके याचा लांब रुमालाने गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय वसमत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
सदरील प्रकरणात मयत प्रभाकरच्या पत्नी छायाबाई प्रभाकर ठोके यांच्या तक्रारीवरून लोभाजी ऊर्फ पिंटू सांगळे व शेख वाजिद शेख चुन्नू याच्याविरुद्ध विविध कलमान्वये हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात वसमत उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायालय वसमत येथे दोषारोपपत्र दाखल केले ज्याचा सत्र खटला क्रमांक 41 / 2020 शासन वि. लोभाजी सांगळे व इतर असा आहे.
सदरील खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण अकरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून 15 जुलै 2022 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय वसमतचे न्यायाधीश यु.सी. देशमुख यांनी दोन्ही आरोपींना खुनाच्या व ऍट्रॉसिटीच्या आरोपात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा एकूण बारा हजार रुपये दंड ठोठावला.
सरकार पक्षातर्फे एडवोकेट नितीन नायक सहा. सरकारी अभियोक्ता यांनी बाजू मांडली. त्यास पेहरवी अधिकारी म्हणून प्रकाश आवडे पोलीस उपनिरीक्षक वसमत, माधव बेटकर पोलिस जमादार, उत्तम वैद्य पोलिस जमादार, पोलीस स्टेशन वसमत तसेच पोलिस नायक रुपेश गरुड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय वसमत यांनी सहकार्य केले.