मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासकीय विभागात कामे करून घेण्यासाठी पैशाची मागणी केली जात असून जो पैसा भेटेल त्याचे काम तात्काळ केले जाते असे चित्र सध्या दिसून येत आहे. यातून अनेक जण लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असून जुलै महिन्यात एकूण आठ प्रकरणे घडली आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण वाढले आहे गेल्या वर्षी एकूण आठ प्रकरणे घडली होती. तर यंदा जुलै महिन्यातच आठ प्रकरणे घडलेली आहेत.
हिंगोली जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण यंदा अधिक असल्याचे दिसते. कोणत्याही शासकीय विभागात काम करून देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य, व्यापारी, सामाजिक संस्था यांच्याकडे पैशाची मागणी केली जाते अनेक जण आपले काम करून घेण्यासाठी गपगुमान या अधिकाऱ्यांना पैसे देतात; मात्र काही सजग नागरिक अधिकारी-कर्मचार्यांच्या जाळ्यात आवडत का लाचलुचपत विभागाकडे जाऊन आपली तक्रार देऊ लागले आहेत. यामुळे अनेक अधिकारी कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले जाऊ लागले आहेत.
सन 2022 मध्ये जुलै महिन्यापर्यंत लाच घेताना एकूण 14 अधिकारी कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले असून लाचलुचपत विभागाकडून 8 सापळे कारवाई यशस्वी करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली येथील जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग (आरोपी- 2) महसूल विभाग मंडळ अधिकारी (आरोपी संख्या 2), महसूल विभाग तलाठी (आरोपी- 1), पंचायत विभाग गटविकास अधिकारी (आरोपी- 1), पोलीस विभाग (आरोपी -एक), पंचायत विभाग (आरोपी -2, कंत्राटी), सहाय्यक निबंधक सहकारी विभाग (आरोपी -3), नगरपरिषद (आरोपी -3), अशी कारवाई करण्यात आली आहे. गतवर्षी लाचलुचपत विभागाकडून 8 यशस्वी सापळे कारवाई करण्यात आली होती.
यंदा जुलै महिन्यातच 8 यशस्वी सापळे कारवाई झालेली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भ्रष्टाचार अधिक असल्याचे दिसून येते. वाढलेल्या भ्रष्टाचाराने राज्यात हिंगोली जिल्ह्याची प्रतिमा मलीन होत असून याकडे प्रशासनासह सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे आहे.
नागरिकांनी पुढे यावे – पोलीस उपअधीक्षक सुरडकर
शासकीय कार्यालयात अथवा कुठेही आपले काम करून घेण्यासाठी कोणीही पैशाची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी 9822200959 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोलीचे पोलीस उपाधीक्षक निलेश सुरडकर यांनी केले आहे.