मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील रिधोरा येथील महा आवास अभियानाअंतर्गत तीन लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरीय घरकुलाचे बांधकाम केल्याने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत भावास अभियान सन 2021 – 22 मध्ये सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथील तीन लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या घरकुलाचे उत्कृष्ट बांधकाम केले. या बांधकामाला ची दखल घेऊन शासनाकडून ग्रामपंचायत स्तरीय प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रिधोरा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, विस्ताराधिकारी देशमुख, महाकाल, ग्रामसेवक व्हि. डी. मोरे व गावातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
रिधोरा गावातील या तिघा लाभार्थ्यांनी महा आवास अभियानाअंतर्गत मिळालेल्या घरकुलाचे उत्कृष्ट बांधकाम केलेले असले तरी बांधकाम साहित्य महागल्याने अनेकांना घरकुल पूर्णत्वास नेण्याकडेही आर्थिक अडचणी येत आहेत. शासनाने बाजारात वाढलेल्या स्टीलच्या किमती, लोखंड, गौण खनिज, विटा, सिमेंट यांच्या किमती लक्षात घेऊन तसेच मजूर दार आणि गवंडी याचीदेखील मजुरी वाढल्याने या सर्व बाबींचा विचार करून घरकुल योजनेचा निधी साडेतीन ते चार लाख रुपये करण्याची गरज आहे. कारण शासन सध्या देत असलेल्या घरकुल योजनेचा निधी हा अत्यंत तोटका असा असून एक लाख पन्नास हजार रुपयात कोणतेही बांधकाम होत नाही ही वस्तुस्थिती आहे. लाभार्थ्यांना त्यांच्याजवळील जमापुंजी घरकुल बांधतांना लावावी लागते.
तसेच सामाजिक व आर्थिक कमकुवत घटकांना व्याजाने अथवा बँकेकडून कर्ज घेऊन घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे लागते. त्यातही बनावे तसे घर तयार होत नाही. परिणामी बहुतांश लाभार्थ्यांच्या परिपूर्ण घरकुलाचे स्वप्न अपुरेच राहते. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून शहरी व ग्रामीण अशा दोन्ही पातळीवरील लाभार्थ्यांच्या घरकुल योजनेच्या निधीत किमान साडेतीन ते चार लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.