मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मागील काही दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात विदर्भात तसेच हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे पेन गंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असून कळमनुरी तालुक्यातील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरण जुलै महिन्यातच 91 टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तसेच धरण क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ईसापुर धरणातून 1295 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. या पाण्याच्या निसर्गाने पेनगंगा नदी काठच्या तसेच धरण परिक्षेत्रातील गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
उर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापूर धरण सद्यस्थितीत 91 टक्के भरला असून नदीत 1295 क्यूसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पेनगंगा नदीपात्रात पाणी सोडल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी काठच्या गावाना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.
तसेच कोणीही नदी पात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी संबंधित गावांमध्ये दवंडी तसेच महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा इत्यादी माध्यमाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, अशा सूचना तहसीलदार कळमनुरी यांना दिलेल्या आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.