Marmik
Hingoli live

आरक्षण सुटताच अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग; पक्षांकडून नवीन उमेदवारांची शोधाशोध

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-


हिंगोली – जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, हिंगोली आणि सेनगाव पंचायत समिती गणांचे तसेच जिल्हा परिषदेचे 28 जुलै रोजी आरक्षण सोडत करण्यात आली. सुटलेल्या आरक्षणानुसार अनेक जागा या मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, राखीव महिला तसेच सर्वसाधारण महिलांसाठी सुटल्याने अनेकांचा हिरमोड झाला तर काही जण बाद झाले. असे असले तरी जाहीर झालेल्या आरक्षणाने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून काहींनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. अनेक जागा या राखीव सुटल्याने संबंधित जागांसाठी सर्वच पक्षांनी राखीव प्रवर्गातील विश्वासू उमेदवार शोधण्यास सुरुवात केल्याचे दिसते.

28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोडत करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत झाली. यावेळी अनेक जिल्हा परिषद सर्कल हे राखीव सुटल्याने तसेच काही जागा या महिलांसाठी राखीव सुटल्याने दिग्गजांना मोठा धक्का बसला. काही तर निवडणुकीतूनच बाद झाले. जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अनेक उमेदवारांनी मागील दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. या उमेदवारांनी जिल्हा परिषद सर्कल मध्ये जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या होत्या.

तसेच काहींनी तर निवडून आल्यानंतर त्या – त्या सर्कल मधील ग्रामस्थांच्या सर्व अडचणी सोडविल्या जातील, असे मतदारांना सांगितले होते, मात्र अनेक जागा या राखीव तसेच महिलांसाठी सुटल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव, हिंगोली या चारही पंचायत समिती गणामध्ये ही कमी-अधिक फरकाने असेच चित्र दिसून येत आहे. पंचायत समिती गणातील अनेक जागा या राखीव सुटल्याने सदस्य पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना आणखी काही वर्ष वाट पहावी लागणार आहे.

अनेक जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गण हे राखीव सुटल्याने संबंधित जागांवर कोणास उभे करता येईल याची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केल्याचे दिसते.

वरुड चक्रपान गण आणि सर्कल राखीव


सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान हे जिल्हा परिषद सरकल आणि सेनगाव पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव सुटला आहे. येथून काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे दोन खंदे समर्थकांची नावे चर्चिली जात होती; मात्र वरुड चक्रपान जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गण हा अनुसूचित जाती साठी राखीव निघाल्याने संबंधितांचा मोठा हिरमोड झाला आहे. पानकनेरगाव जिल्हा परिषद सर्कल मात्र सर्वसाधारण महिला आणि पंचायत समिती गण नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी सुटल्याने येथे कोणा एका कार्यकर्त्यास संधी दिली जाऊ शकते, मात्र या ठिकाणावरून आता काँग्रेस पक्षाकडून कोणाला संधी मिळते हे पाहणे गरजेचे आहे.

Related posts

रामनारायण गगराणी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करा, विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलची मागणी

Gajanan Jogdand

प्रवाशाचे पैसे काढून घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकासह दोघे अवघ्या काही तासात जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Santosh Awchar

दोन सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

Leave a Comment