मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / गजानन जोगदंड :-
हिंगोली – राज्यात सत्ता नाट्य घडून जवळपास एक महिना उलटला आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तारही झाला. यामुळे काही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले, मात्र अनेक जिल्ह्यांना पालक मंत्रीच मिळालेले नाहीत. हिंगोली हाही पालकमंत्री न मिळालेला जिल्हा आहे. जिल्ह्यात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने देश प्रेम ओतप्रोत भरून वाहू लागले आहे. जिल्हावासियांचा हा आनंद द्विगुणित होण्यासाठी जिल्ह्याला पालकमंत्री मिळणे गरजेचे होते तसे झाले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांशीवाय भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे ध्वजारोहन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते.
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अनेक वेळा पालकमंत्र्यांशीवाय स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन झाल्याचे जाणकार सांगतात, मात्र अशी परिस्थिती विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घडल्याचेही सांगितले जाते. यंदा परिस्थिती वेगळी आहे. देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.
13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या घरांवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील नागरिकही उत्साहाने राष्ट्रीय ध्वज खरेदी करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने जिल्ह्यातील वातावरण देशप्रेमाने ओतप्रोत भरून वाहत आहे. नागरिकात एक वेगळाच आनंद, उत्साह आणि चैतन्य आहे. अशा या परिस्थितीत हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री मिळाले असते तर नागरिकांच्या आनंदात भरच पडली असती.
तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ही दिलासा मिळाला असता मात्र तसे अद्यापही घडले नाही. राज्यातील सत्तानाट्य घडून जवळपास एक महिना लोटला आहे. दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारही झाला. या मंत्रिमंडळ विस्तारातून काही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले तर बहुतांश जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले नाहीत. त्यातीलच एक जिल्हा हिंगोली. जिल्ह्याला पालकमंत्री न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन होईल.
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदतीची आशा
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या 75 ते 80 टक्के मोसमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणात शेती पिके बाधित झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक शेतात पाणीच पाणी झाले असून अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी जोर धरत आहे, मात्र जिल्ह्यात अद्यापही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही.
जिल्ह्याला पालकमंत्री कधी मिळणार?
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे ध्वजारोहन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यातील शेतकरी झालेल्या अतिवृष्टीने मदतीच्या आशेत आहे जिल्ह्याला पालक मंत्री म्हणून औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमात होत आहे. तसेच काही इतर नावेही चर्चेत आहेत. परंतु सध्या केवळ चर्चा होत असून जिल्ह्याला पालक मंत्री मिळणार कधी हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.