मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सार्वजनिक रस्त्यावर खड्डे केल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा देत सार्वजनिक रस्त्यांवर खड्डे करू नये असे आवाहन हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
Covid-19 च्या कालखंडानंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून सार्वजनिक रस्त्यांवर खड्डे करून स्टेज मंडप उभारले जातात. यामुळे सार्वजनिक रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
या आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंगोली शहरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांमार्फत स्टेज, डेकोरेशन करण्यात येतात. त्यानुसार सदरील मंडप स्टेज उभारतांना कोणत्याही प्रकारे सार्वजनिक रस्त्यांवर खड्डे करण्यात येऊ नये. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची निर्मिती होते.
परिणामी रस्त्यांचे विद्रुपीकरण होते. त्यानुसार हिंगोली शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपले गणेश मंडळाचे स्टेज, मंडप उभारताना रस्त्यावर खड्डे न करता उभारण्यात यावे याची काळजीपूर्वक दक्षता घ्यावी अन्यथा तसे निदर्शनास आल्यास संबंधित गणेश मंडळातील सदस्यांवर नियमानुसार सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करून रस्त्याच्या झालेल्या नुकसानीबाबत दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिला आहे.