मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / अर्जुन पवार :-
खानापूर चित्ता – छत्रपती संभाजी महाराजांसह महापुरुषांची नावे बियर शॉपी व इतर व्यवसायांना लावण्यास प्रतिबंध करून या महापुरुषांची नावे बोधचिन्ह आणि नावे (अयोग्य वापरास प्रतिबंध) कायदा 1950 मध्ये सामाविष्ट करावीत, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आद्य पुरुष होत. त्यांची ख्याती जगविख्यात आहे संभाजी महाराज हे फक्त एवढेच नाही. तर महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार आहेत. तसेच एक उत्कृष्ट लेखक देखील होते.
अशा प्रेरणादायी कारकीर्दीच्या महामानवाचे धूम्रपान करण्याचे एक साधन असलेली बिडी यास नाव देऊन संबंधित व्यक्ती महाराष्ट्रातील युवकांना आकर्षित करून आपला व्यवसाय चालवीत होते; परंतु शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्यात मोठे आंदोलन उभे केले आणि संबंधित व्यक्तीस बीडीवरील महाराजांचे नाव काढण्यास भाग पाडले.
तसेच अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज – फुले – शाहू – आंबेडकर – अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक महामानवांच्या कार्याला उजाळा देऊन देशातील अनेक इतिहासकार नव युवक आत महामानवांच्या इतिहासाने प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु पुरोगामी महाराष्ट्रात अनेक महामानवांच्या नावांचा दुरुपयोग करत काही महाशय बियर शॉपी, हॉटेल, लॉज, पान शॉप म्हणून यामध्ये अवैध गुटखा गांजा दारू विक्री केली जाते.
अशा व्यवसायांना महापुरुषांची नावे देऊन मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात. त्या ठिकाणी जाणीवपूर्वक महामानवांचे नावांची विटंबना केली जाते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यासह इतर महामानवांची नावेबोधचिन्ह आणि नावे (अयोग्य वापरास प्रतिबंध) कायदा 1950 मध्ये समाविष्ट करून घेण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करून राज्यात होत असलेली विटंबना थांबवावी.
तसेच येत्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात यावा अन्यथा शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर फाउंडेशनचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्रीराम जाधव यांची स्वाक्षरी आहे.