मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / नितीन दांडगे :-
संभाजीनगर – साहित्यीक, वक्ते आणि प्रगल्भ विचारवंत नरहर कुरूंदकर यांचे जीवन व कार्य यांचा रंजक वेध घेणारा ‘नरहर कुरूंदकर- एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हा अभिनव नाट्यप्रयोग शुक‘वार, दि.23 सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे सादर होणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी या प्रयोगाचे आयोजन केले आहे.
रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील स्व.भानुदासराव चव्हाण सभागृहात सायंकाळी 7 वा. हा नाट्यप्रयोग होणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या नाट्यप्रयोगाचे मुंबईत मागील आठवाड्याभरात या अभिवाचनाचे चार प्रयोग सादर झाले होते. या प्रयोगाला मुंबईकर जाणकार प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. खास लोकाग्रहास्तव या नाटकाचा प्रयोग संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.
नरहर कुरूंदकर हे बहुआयामी होते
समाजकारण, साहित्य, नाट्यकला, इतिहास, संगीत, राजकारण, तत्वज्ञान अशा विविध अभ्यासक्षेत्रातील प्रश्नांवर अत्यंत मूलगामी प्रश्न उपस्थित करून तर्कदुष्ट मांडणी करण्याबद्दल ते ओळखले जात. त्यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणारी विचार-यात्रा अभिवाचनाच्या या नाट्यप्रयोगातून मांडण्यात आली आहे.
नरहर कुरूंदकर यांच्या कार्याच्या सर्व पैलू दोन तास कालावधीच्या या प्रयोगात मांडण्यात आले आहेत. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, परिणामकारक संगीत, प्रकाश नियोजन तसेच कलाकारांचे अभ्यासपूर्ण सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.नरहर कुरूंदकर प्रतिष्ठानच्यावतीने हा प्रयोग सादर केला जातो आहे. अजय अंबेकर यांनी या नाटकाचे लेखन केले असून मराठवाड्यातील प्रथितयश कलावंत आणि तंत्रज्ञ हे प्रयोग सादर करणार आहेत.
या प्रयोगाला प्रवेश निशुल्क असून प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य असेल. जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.सतीश चव्हाण यांनी केले आहे.