मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – तालुक्यातील अनेक गावात खरीप पिकाच्या सोयाबीन काढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. शेतात काढलेल्या सोयाबीनवर पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचा अक्षरशः चिखल झाला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता व परिसरात मागील दोन दिवसापासून सोयाबीन काढणीला प्रारंभ झाला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या सोयाबीनची काढणी करून शेतातच वाळविण्यासाठी सवंगणी केलेले सोयाबीन शेतातच ठेवले. परंतु निसर्गाचे चक्र फिरल्याने चक्क दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू झाल्याने शेतातील सोयाबीनचा पावसाने भिजल्याने अक्षरशः चिखलच झाला आहे.
खानापूर चित्ता येथील शेतकरी परसरामजी जाधव यांच्या शेतात मागील दोन दिवसापासून सवंगणी केलेले सोयाबीन शेतातच भिजले आहे व दोन दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने त्या सोयाबीनला अंकुर फुटतात की काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
परिसरात दरवर्षीपेक्षा यावर्षी खरिपातील सोयाबीनची पेरणी जास्त प्रमाणात असल्याने सोयाबीन सवंगणीला वेळेवर मजुरी मिळतात की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीसाठी प्रति बॅग ३००० ते ३२०० रुपयाने बॅगी काढण्यासाठी दिले आहेत. तर काही शेतकरी मिळेल त्या भावात मजूर लावून सोयाबीन काढणीला प्रारंभ करीत आहेत.
एकंदरीत शेतकऱ्याच्या सोयाबीन काढण्याची लगबग आणि पावसाची लगबग सुरू झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडतो की काय? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.