मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध प्रकारच्या औषधांचा तुटवडा असल्याचे समजते. असे असले तरी येथील रुग्णालयात इतर काही औषधांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असल्याचे मार्मिक महाराष्ट्र टीमने केलेल्या ‘स्टिंग’ मध्ये उघड झाले.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार कधी ढासळेल याची शाश्वती नाही. रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा वावर असला तरी विविध औषधांचा कायम तुटवडा येथे असतो. त्यातीलच एक म्हणजे कुत्रा चावल्यास घेण्यात येणारी रेबीज लस ही देखील येथे उपलब्ध नसल्याचे समजते. हे म्हणजे अगदीच प्राथमिक आरोग्य केंद्रासारखे झाले. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यांसह स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर होऊन बसलेला आहे.
पहाटे प्रातविधीसाठी रुग्णांसह रुग्णांचे नातेवाईक यांना नाईलाजास्तव उघड्यावर जावे लागते. यामुळे पुन्हा आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतोच. रुग्णालयात एकीकडे विविध प्रकारच्या औषधांचा तुटवडा आहे तर दुसरीकडे मात्र विविध प्रकारच्या औषधांची नासाडी ही केली जाते.
मार्मिक महाराष्ट्र टीमने केलेल्या टिंग मध्ये येथील औषध साठा विभागात विविध प्रकारच्या सलाईन्स निकामी करून एका बाटलीत टाकून सदरील औषधी औषध साठा विभागाच्या मागील बाजूस टाकून दिला जातो तसेच निकामी झालेल्या सलाईन्स देखील उघड्यावर फेकून दिले जातात. हा गंभीर प्रकार मार्मिक महाराष्ट्राच्या स्टिंग मध्ये आढळून आला आहे.
सदरील सलाईन्स कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिथे उपलब्ध नाहीत तेथे दिल्यास तेथील व त्या त्या परिसरातील रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकतो, परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला असे करायचे नसल्याचे दिसते.
परिणामी अनेक ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील रुग्णांना हिंगोली आणि हिंगोली जिल्हा रुग्णालयातही औषधी नसल्याचे सांगून केव्हा सोयी सुविधा नसल्याचे सांगून नांदेड येथे हलविण्यास सांगितले जाते. रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार जिल्ह्यातील नागरिकांना चांगलाच नडत असल्याचे दिसते.