मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-
औंढा नागनाथ – राज्यातील बौद्ध, मातंग, चर्मकार, होलार व दलित आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढत चालले आहेत. अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोपींवर कडक कारवाई करावी तसेच नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांकष अभ्यास करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन डी एम जे) संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली.
यावेळी राज्यसचिव वैभव गीते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व मागण्या समजावून सांगितल्या. तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बौद्ध, दलित आदिवासींच्या हक्काचा प्रगतिचा योजनांचा निधी इतरत्र वळवू नये व अखर्चित ठेऊ नये म्हणून राजस्थान व तेलंगना सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात बजेटचा कायदा करावा, मुख्यमंत्री यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितिची स्थापना करुन वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलावून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
एट्रोसिटी एक्टच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या दर्जाचा समन्वय अधिकारी नियुक्त करुन सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,पोलिस आयुक्त,सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांचा आढावा घेण्यात यावा, जातीय अत्याचारात बौद्ध,दलित आदिवासींचे 632 खून झालेले आहेत. या सर्व कुटुंबियांचे शासकीय नोकरी,जमीन पेंशन देऊन पुनर्वसन करावे, मागासवर्गीयांच्या मिनी ट्रैक्टरच्या योजनेसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावेत, कर्मवीर दादासाहेब गायकवाड व स्वाभिमान योजनेअंतर्गत बौद्ध, मातंग, चर्मकार होलार यांच्यासह अनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांना चार एकर जिरायती जमीन व दोन एकर बागायती जमीन द्यावी.
शासनाच्या ताब्यात असलेल्या गायरान,गावठान,शेती महामंडळ,व इतर जमीनी योजनेअंतर्गत भूमिहीनांना द्याव्यात, खून,बलात्कार,जाळपोळ,या गुन्ह्यांमधील पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात प्रलंबित असलेली आकस्मिकता योजना लागू करा, बौद्ध,दलित आदिवासींच्यावर अन्याय अत्याचार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आदि मागण्याकरिता नॅशनल दलित मुव्हमेंट फ़ॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी संपादक राहुल सावंत, एन.डी. एम.जे संघटनेचे पंढरपुर तालुक्याचे नेते रतिलाल बनसोडे, सागर ब्राम्हणे, सचिन पाखरे हे उपस्थित होते.