मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरातील कळमनुरी कडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे गेट नंबर 144 बी येथे रेल्वे ब्रिजचे काम सुरू आहे. सदरील काम करताना अडचणी येऊ नयेत तसेच अपघात होऊ नये म्हणून 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1)(ख) अन्वय अधिसूचना काढून 8 ऑक्टोबर पासून पुढील 60 दिवसांसाठी सध्या कार्यरत असलेला संबंधित वाहतुकीचा रस्ता बंद करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत निर्देश दिले होते, परंतु या कालावधीत झालेल्या सततच्या पावसाने व चिखलाने एम आर आय डी सी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांनी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनविला नव्हता; मात्र सध्या पर्यायी रस्ता बनविला असून सदरील रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच एम आर आय डी सी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी केले आहे.
हिंगोली जिल्हाधिकारी यांनी 6 ऑक्टोबर रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार 8 ऑक्टोबर पासून पुढील 60 दिवसांसाठी सध्या कार्यरत रेल्वे गेट नंबर 144 बी येथील वाहतुकीचा रस्ता बंद करून वाहतुकीसाठी नवीन पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यात मोठी वाहने जी हिंगोली शहरातून कळमनुरी कडे जाणारी ते हिंगोली शहरातून पुढे अकोला बायपास गारमाळ वरून खटकाळी बायपास त्याच मार्गे कळमनुरी कडून हिंगोली शहरात येणारे जे मोठे वाहने आहेत ते खटकाळी बायपास येथून गारमाळ पुढे अकोला बायपास येथून हिंगोली शहरात येतील.
तर लहान चार चाकी व दुचाकी वाहने सदर वाहने रेल्वे गेट शेजारी तात्पुरते निर्माण केलेल्या पर्यायी मार्गाने जातील ज्यात हिंगोली कडून कळमनुरी कडे जाणारे आहे त्यांनी नवीन बनत असलेला रेल्वे पूल त्याखालून उजव्या बाजूने जीनमाता नगर मधील सिमेंट रस्ता पुढे नवीन पर्यायी बनविलेला कच्चा रस्ता समोर जाऊन रेल्वे भुयारी पूल पुढे खटकाळी हनुमान मंदिर खटकाळी बायपास असा मार्ग असेल तर कळमनुरी कडून हिंगोली शहरात येणारे चार चाकी व दुचाकी वाहने हे खटकाळी बायपास येथून पुढे खटकाळी हनुमान मंदिर पुढे समोर जाऊन उजव्या बाजूने नवीन पर्यायी बनविलेला कच्चा रस्ता समोर जाऊन रेल्वे भुयारी पूल पुढे जीनमाता नगर मधील सिमेंट रस्त्याने हिंगोली शहरात जातील असा पर्यायी नवीन वाहतूक मार्ग असेल असे निर्देश दिलेले आहेत.
मात्र, ठरल्याप्रमाणे नमूदकाळात संबंधित एम आर आय डी सी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांनी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता पूर्ण बनविला नसल्याने व मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्यांनी 8 ऑक्टोबर पासून मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करून पर्याय रस्त्याच्या वापराबाबत अंमलबजावणी केली नव्हती, परंतु सध्या नमूद एमआयडीसी यांनी पर्यायी रस्ता बनविला असून रेल्वे ब्रिज काम सुरू केल्याने दोन नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर पावतो मुख्य रस्ता रहदारीसाठी बंद करून वरील प्रमाणे पर्यायी व रस्त्याने वाहतूक वळविण्याबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहेत.
तसेच 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोली शहरातून जाणार असल्याने नमूदकाळात रेल्वे ब्रिज जवळील काम बंद राहणार आहे. पुढे दि. 15 नोव्हेंबर ते 10 जानेवारी 2023 पर्यंत परत मुख्य रस्ता रहदारीसाठी बंद करून वरील प्रमाणे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सदर ठिकाणावरून प्रवास करणारे सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
तसेच नमूदकाळात रेल्वे गेट व खटकाळी बायपास पासून तयार केलेल्या नवीन पर्यायी मार्गाने प्रवास करताना सुरक्षितरीत्या व वाहतूक कोणी होणार नाही याची खबरदारी घेऊन प्रवास करावा. एम आर आय डी सी यांच्याकडून नागरिकांच्या सुविधेसाठी सदर नवीन पर्यायी मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक व फ्लॅगमॅन यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.