मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – ऑनलाइन जुगार चक्री चालविणाऱ्या सहा इसमाविरुद्ध हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेला धडक कार्यवाही करत एक लाख 24 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच नरसी नामदेव पोलीस ठाण्यात भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
8 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे दिनेश जयस्वाल यांच्या सेटर मध्ये शेख असलम शेख बेबन हा लोकांना अधिक पैशाचे प्रलोभन दाखवून एक ते दहा आकड्यावर ऑनलाईन चक्री नावाचा जुगार खेळवीत आहे अशी माहिती मिळाल्यावर हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचासह जाऊन सदर ठिकाणी एक ते दहा आकड्यावर लोकांना अधिक पैशाचे आमिष दाखवून ऑनलाइन जुगाराचा खेळ खेळत असताना कार्यवाही केली.
सदर कार्यवाहीत पोलिसांनी सदर जुगार चालविणारा दीपक प्रभाकर अपुने, शेख रियाज शेख नजीर रा. पुसेगाव, शेख मकसूद शेखलाल मिया, विठ्ठल तुळशीराम पवार यांच्या ताब्यातून ऑनलाईन जुगाराचे साहित्य ज्यात सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड, लॅपटॉप, माऊस, केबल, इन्वर्टर बॅटरी, एक ते नऊ आकडे लिहिलेला रेगजीनचा पार्ट व भिंतीवर चिटकविलेला आकड्यांचा चार्ट, एक रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, एक नेट सेटर व डोंगल व नगदी एकूण एक लाख 24 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी नरसी नामदेव पोलीस ठाण्यात एकूण सहा आरोपींविरुद्ध भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, शेख शकील, विठ्ठल कोळेकर, राजूसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे, चापोशि तुषार ठाकरे यांनी केली.