खासदार राहुल गांधी हे आपल्या भारत जोडो यात्रेसोबत कोणत्या वेळी हिंगोलीत दाखल होणार हे हिंगोली काँग्रेसने जाहीर केले असते तर यात्रेला काहीतरी वेगळे स्वरूप आले असते, मात्र तसे झाले नाही.
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची महत्त्वाकांक्षी असलेली भारत जोडो यात्रा हिंगोली येथून 14 नोव्हेंबर रोजी सकाळी मार्गस्थ झाली. सदरील वेळेत अधिकांश हिंगोलीकर झोपेतच होते. तसेच नागरिकांना खासदार राहुल गांधी यांची हिंगोली शहरात येण्याची वेळ माहित नव्हती. खासदार राहुल गांधी हे हिंगोली शहरातून गेले तरी नागरिकांना माहित पडले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांतून या यात्रेस अल्पसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठरल्या वेळेनुसार 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली 13 नोव्हेंबर रोजी ही यात्रा कळमनुरी येथे मुक्कामी होती. तेथून सदरील यात्रा पहाटेच निघून हिंगोली शहरात सकाळी साडेसहा ते पावणे सात वाजेच्या दरम्यान दाखल झाली. या वेळेत राहुल गांधी हे एनटीसी येथे उभारलेल्या स्टेजवर होते. सदरील वेळेत अधिकांश हिंगोली कर झोपेतच होते.
थंडीचे दिवस असल्याने तसेच दिवस लहान असल्याने सकाळ कधी झाली हेच कळेनासे झालेले आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पहावयाचे होते राहुल गांधी यांची ही यात्रा हिंगोली शहरात सकाळी 10 ते 11 या वेळेत येईल आणि खासदार राहुल गांधी हे किमान दोन तास तरी थांबतील अशी अपेक्षा नागरिकांना होती, मात्र सकाळी साडेसहा ते पावणे सात या वेळेतच ही यात्रा हिंगोली शहरात दाखल होऊन सकाळीच मार्गस्थ सुद्धा झाली.
यात्रेत वाजणाऱ्या डीजे चा आवाज तेवढा नागरिकांना ऐकायला आला. त्यामुळे काही नागरिक घराबाहेर पडले, मात्र मार्गावरील नागरिक वगळता हिंगोली शहराच्या कानाकोपऱ्यात हा आवाज गेला नाही. त्यामुळे बहुतांश हिंगोली करांना राहुल गांधी गेले तरी माहीतच पडले नाही. त्यांचे राहुल गांधी यांना पाहण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.
खासदार राहुल गांधी हे आपल्या भारत जोडो यात्रेसोबत कोणत्या वेळी हिंगोलीत दाखल होणार हे हिंगोली काँग्रेसने जाहीर केले असते तर यात्रेला काहीतरी वेगळे स्वरूप आले असते, मात्र तसे झाले नाही. परिणामी यात्रेत पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी व इतर जिल्ह्यातून आयात केलेल्या पक्षातील कार्यकर्ते आणि नागरिकांशिवाय हिंगोलीतून या यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही.