मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरात मागील काही दिवसांपासून गुटका व तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम मोठ्या प्रमाणात सर्रासपणे विक्री केली जात होती. यात स्थानिक पोलिसांसोबत गुटका माफी यांचे लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कार्यवाही होत नव्हती. तसेच सदरील प्रकाराकडे हिंगोली शहर पोलीस दुर्लक्ष करत होते; मात्र नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा विक्रीवर कार्यवाही करत 5 लाख 69 हजार 660 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंद्यानविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 15 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हिंगोली शहरातील कटके गल्ली पेन्शनपुरा भागात युनूसखा जब्बारखा पठाण याच्या राहते घराच्या वरील रिकाम्या खोलीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला तंबाखू विक्री करण्यासाठी साठवलेला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस स्टाफ यांनी मिळून कटके गल्ली पेन्शन पुरा भागात युनूसखा जब्बारखा पठाण याच्या राहते घरी दोन पंचासमक्ष छापा मारला.
यावेळी इसम नामे युनूसखा जब्बारखा पठाण (वय 55 वर्षे राहणार कटके गल्ली पेन्शनपुरा हिंगोली) याच्या राहत्या घरातून v-1 तंबाखू, बाबा – 120, बाबा – 160, पान पराग, रत्ना सुगंधित तंबाखूचे पोते व बॉक्स (ज्याची बाजारातील एकूण किंमत 5 लाख 69 हजार 660 रुपये) असा मिळून आला.
सदरच्या गुटक्या बाबत युनूसखा जब्बारखा पठाण यास विचारपूस केली असता सदरचा गुटखा हा त्याचा भाऊ वसीम खा जब्बारखा पठाण याने चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याचे सांगितले.
या प्रकरणी दोन्ही आरोपीं विरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, गजानन पोकळे, शेख शकील, नितीन गोरे राजूसिंग ठाकूर, किशोर सावंत, विशाल खंडागळे, रवीना घुमनर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
केवळ माफियावरच कारवाईचा बडगा नको; दोशी पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी
जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेताच जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांची उचल बांगडी व हद्दपारची कार्यवाही सुरू आहे; मात्र जिल्ह्यात संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय संबंधित पोलीस ठाणे हद्दीत कोणताही माफिया असा स्वयंरपणे आपला धंदा करत नाही. त्यास पोलिसांचे पाठबळ असते असे दिसते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी माफियावर कार्यवाही करावीच, परंतु त्या माफिया सोबत आपले उखळ पांढरे करणाऱ्या पोलिसांवरही कार्यवाही करावी ही अपेक्षा.