मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – केंद्र व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात स्टुडंट पोलीस कॅडेट (एस. पी. सी.) उपक्रम राबविला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा शारीरिक व मानसिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये प्रचलित कायदे व नियमानबाबत जागरूकता असावी यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण 28 जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली असून यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नमूद सर्व शाळेतील मुख्याध्यापकांची बैठकही घेण्यात आली. तसेच संबंधित सर्व शाळांमधील इयत्ता 8 वी ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बोलावून पोलीस प्रशासनातील विविध व विभाग तसेच कामकाजाची पद्धत याबाबत माहिती देण्यात आली.
सध्या सदर उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष शाळेत जाऊन पोलिस अधिकारी व अंमलदार हे नमूद एस. पी. सी. कार्यक्रम घेत आहेत.
सदर पोलीस पथकात भरोसा सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, दामिनी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार माधव बेले, आरती साळवे, शेख सलमा, अर्चना नखाते तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार पारसकर यांचा समावेश आहे.
नमूद पोलीस पथकाने 21 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला हट्टा, जवळा बाजार व औंढा नागनाथ येथे तर 23 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला शिरडशहापूर व कुरुंदा तसेच 25 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला वाकोडी, कळमनुरी व मसोड असे तीन दिवसात एकूण जिल्ह्यातील 8 जिल्हा परिषद शाळांवर जाऊन एस.पी. सी. कार्यक्रमांतर्गत उपक्रम घेतले आहेत.
त्यात नमूद पोलीस पथकाने विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत, संकटकाळातील सोबती डायल 112 उपक्रम, गुन्हे प्रतिबंध, बालविवाह, मुलींची सुरक्षा व त्यासंबंधी कायदे, दामिनी पथक, ऑनलाईन फसवणूक व सोशल मीडियाचा वापर बाबत जागरूकता आदी विविध विषयावर सविस्तर व प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
उद्यापासून जिल्ह्यातील उर्वरित इतर जिल्हा परिषद शाळांमध्ये ही जाऊन सदरचे एस. पी. सी. कार्यक्रमांतर्गत उपक्रम घेतले जाणार आहेत.