मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष विचार :-
हिंगोली – जिल्हा पोलीस दलातील श्वान विभागातील अंमली पदार्थ पथकामध्ये मागील 10 वर्ष 4 महिन्यापासून कार्यरत असलेला राणा श्वानाचे 30 नोव्हेंबर रोजी आजाराने निधन झाले.
मागील प्रदीर्घकाळापासून राणा हा श्वान पथकातील एक रुबाबदार असा श्वान होता. सदर राणा श्वानाने अंमली पदार्थ शोधक म्हणून दैनंदिन आवश्यक ठिकाणी तसेच रेल्वे स्थानक, बस स्थानक इत्यादी ठिकाणी तपासणीसाठी काम केलेले आहे.
राणा श्वानाने पोलीस कर्तव्य मेळाव्यात सन 2013 व सन 2018 मध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.
आज रोजी जुने पोलीस मुख्यालयात राणा श्वानास पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात सन्मानपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
पोलीस अधीक्षक यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर उपस्थित आर्म गार्डने एस. एल. आर. च्या तीन फेरी आकाशात झाडून राणा श्वानास मानवंदना दिली. त्यानंतर पोलीस मुख्यालय परिसरात मयत राणा श्वानावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी प्रभारी पोलीस उप अधीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, राखीव पोलीस उपनिरीक्षक सतीश मुळतकर, श्वान विभाग बीडीडीएस, एटीबी, आदी शाखेतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.