Marmik
Hingoli live

रेल्वे प्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची सकारात्मक चर्चा, हिंगोलीकरांच्या आशा पुन्हा पल्लवीत!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – जिल्ह्याच्या रेल्वे बाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांच्याशी रेल्वे संघर्ष समितीची चर्चा घडवून आणण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी हिंगोलीत दिला.

हिंगोली जिल्ह्याचा रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणखी एका नेत्याने शब्द दिल्याने हिंगोलीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताच माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा निहाय दौरे सुरू केले आहेत.

या अंतर्गत सोमवारी ते सबंध दिवस हिंगोलीत होते. सकाळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सर्व पत्रकारांनी रेल्वेचा प्रश्न उचलुन धरला. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीतही त्यांना आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते व रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोलीकरांच्या रेल्वे बाबतच्या मागण्याचे गांभीर्य आपआपल्या स्तरावर सांगितले.

सायंकाळी शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी बावनकुळे यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कायदा, वैद्यकीय, शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवरांनी आपआपल्या क्षेत्रातील अडचणी व सुचना सांगितल्या.

यावेळी रेल्वे संघर्ष समितीच्या सदस्यांनी सुद्धा एक निवेदन दिले. समितीतर्फे पत्रकार बसंतकुमार भट्ट यांनी वाशिम व हिंगोली जिल्ह्यासाठी मुंबईकरिता एकही थेट रेल्वे नसल्याचे सांगितले. शिवाय प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या निवेदनात पुर्णा- अकोला मार्गे जाणारी रेल्वे मनमाड मार्गे वळविल्याचा विषय सुद्धा नमुद करण्यात आला.

रेल्वे संघर्ष समितीच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, याबाबत पक्ष पातळीवर चर्चा करून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई किंवा दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत मुंबई व छपरा रेल्वे सहीत रेल्वे बाबतच्या सर्व प्रस्तावांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. यासाठी आपण जातीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

यापूर्वी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुख्य प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, रेल्वे राज्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर हिंगोलीत झालेल्या रेल्वेरोको आंदोलनाच्या पृष्ठभुमीवर आ. मुटकुळे यांनी संघर्ष समितीची रावसाहेब दानवेंशी भेट घालुन दिली. दिल्लीत रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी घेतली होती; परंतु त्यांच्याकडुन काहीच उत्तर आले नाही.

आता नव्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीही जबाबदारी घेतल्यामुळे या प्रश्नी काही तोडगा निघेल, असा आशावाद रेल्वे संघर्ष समितीतर्फे व्यक्त होत आहे.  

Related posts

अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये अंमली पदार्थ विरोधी ठराव घ्यावेत – जिल्हाधिकारी पापळकर

Santosh Awchar

चौंडी, दाताडा येथील मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यातून गिरवले जाताहेत शिक्षणाचे धडे!

Gajanan Jogdand

हिंगोली जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

Gajanan Jogdand

Leave a Comment