मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील कुरुंदा पोलीस ठाणे परिसरातील अवैध गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील तो गुन्हेगारी वृत्तीपासून परावृत्त होत नसल्याने हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या गुन्हेगाराविरुद्ध पोलीस ठाण्याकडून एमपीडीए प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना दिल्या.
यावरून कुरुंदा पोलीस ठाणे येथील सराईत गुन्हेगार नामे राजू गोविंद चव्हाण (वय 40 वर्ष रा. औंढा नागनाथ जि. हिंगोली) याचा एमपीडीए प्रस्ताव क्रमांक 01 / 2022 प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलीस ठाणे व वायडी गवळी, कुरुंदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक यांनी सादर केले.
त्यावरून त्यामधील स्थानबद्ध नामे राजू गोविंद चव्हाण हा नेहमी कुरुंदा पोलीस ठाणे परिसरात अवैध दारू विक्री करून दहशत निर्माण करत असल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्याप्रमाणे कार्यवाही करून जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे एक वर्षासाठी स्थानबद्ध आदेश पारित करून घेतले.
स्थानबद्ध इसमास परभणी कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वेळोवेळी सदर प्रस्तावा बाबत पाठपुरावा करून या कार्यवाहीत मदत केली.
सराईत गुन्हेगारास कारागृहात स्थानबद्ध करण्याची एमपीडीए कायद्याअंतर्गत ही सलग पाचवी कार्यवाही आहे.