मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – पैनगंगा, कयाधू व पूर्णा नद्यांच्या खोऱ्यात वसलेला हिंगोली जिल्हा हा हळद या पिकासाठी महाराष्ट्र राज्यात सर्वात अग्रगण्य आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, हळदीसह इतर पिकांनाही शाश्वत बाजारभाव मिळावा, शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी, शेतकरी व देश, राज्य पातळीवरील नामांकित कृषि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून कृषि विभागाच्या संकल्पनेतून नवीन वर्षाच्या सुरुवातीला हिंगोली येथील रामलीला मैदानावर भव्य जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सव दि. 13 जानेवारी ते दि. 16 जानेवारी, 2023 या कालावधीत नियोजित केला होता.
या महोत्सवामध्ये 200 पेक्षा जास्त स्टॉल, परिसंवाद, प्रत्यक्ष राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची दालने, विविध संशोधन केंद्रे, स्पाईसबोर्ड, कृषि निविष्ठा, सिंचन साधने, गृहपयोगी विक्री दालन, मशिनरी व अवजारे, कृषि विज्ञान केंद्र, हळदीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. प्रामुख्याने हळद या पिकाचे 40 ते 50 स्टॉल असणार होते.
तसेच चार दिवस शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी हळद उत्पादन तंत्रज्ञान, हळद बेणे उत्पादन, हळद लागवड, निर्मिती, काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान, हळद प्रक्रिया, हळद प्रक्रियेतील गुणवत्तेचे निकष, हळद प्रक्रिया उद्योगातील संधी व आव्हाने, हळद मूल्यवर्धन साखळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादन, बाजारभाव व भौगोलिक मानांकन, जागतिक आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (मिलेट) वर्ष याबाबत विविध विषयावर मार्गदर्शन, शेतमालाचे खरेदी विक्रीबाबत मार्गदर्शन, शेतमालाचे मूल्यवर्धन, उत्पादक ते खरेदीदार संमेलन, जिल्ह्यात नवीन पिके जसे ड्रॅगन फ्रूट, करवंद, करडई लागवड या पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन, तसेच विविध पिकाचे आधुनिक तंत्रज्ञान इत्यादी विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार होते.
सद्यस्थितीत दि. 29 डिसेंबर, 2022 रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणूक घोषित झाल्याने व निवडणुकीची आदर्श आचारसंहिता तात्काळ लागल्यामुळे जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.
तसेच आचारसंहिता संपताच सदरील जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी हिंगोली तथा अध्यक्ष जिल्हा कृषि महोत्सव समिती, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.