मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील खून खटल्यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड वसमत येथील अप्पर सत्र न्यायालयाने ठोठावला आहे.
हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील असोला येथे 24 जानेवारी 2018 रोजी आरोपी गणपत उर्फ गणेश प्रभाकर कीर्तने याने किशोर कीर्तने यांच्या पोटात चाकू खूपसून खून केला होता. यावरून फिर्यादी नामे कमलबाई ग्यानोजी कीर्तने (रा. असोला) यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात भादविसह कलम 135 मपोका अन्वय गुन्हा दाखल झाला होता.
सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील चंद्रकांत नाईक यांनी कसोशीने पूर्ण करून सबळ पुरावे हस्तगत करून गुन्ह्यातील आरोपी याच्या विरुद्ध अप्पर सत्र न्यायालय वसमत यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
तदनंतर आरोपी गणपत उर्फ गणेश प्रभाकर कीर्तने (वय 19 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. नवीन वसाहत असोला ता. औंढा नागनाथ) याच्याविरुद्ध अप्पर सत्र न्यायालय वसमत येथे खटला चालून ज्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सहाय्यक सरकारी वकील एन. एच. नायक व दासरे यांनी एकूण 11 साक्षीदार तपासले.
आरोपी गणपत उर्फ गणेश कीर्तने याने खुनाचा गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने त्यास अप्पर सत्र न्यायाधीश वसमत उमाकांत चं. देशमुख यांनी 10 जानेवारी 2023 रोजी दोशी ठरवून आरोपीस जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणी सुनावणी दरम्यान पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांनी वेळोवेळी दिलेल्या विशेष सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्यातील साक्षीदार यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, पोह उत्तम वैद्य, हिरामण चव्हाण यांनी योग्य मार्गदर्शन करून काम पाहिले.