मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणाऱ्या टोळीचा हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून 2 लाख 11 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरील टोळीकडून जिल्ह्यातील शेतमाल चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतमाल (धान्य) चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत आखाडा बाळापूर पोलीस ठाणे, कळमनुरी पोलीस ठाणे, औंढा नागनाथ पोलीस ठाणे, सेनगाव पोलीस ठाणे, हट्टा पोलीस ठाणे व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून सदर गुन्हे करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्याचे आदेश हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत दिले होते.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली चे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व त्यांच्या तपास पथकाने सदर गुन्ह्यांच्या घटनास्थळांचा बारकाईने अभ्यास करून गोपनीय माहितीच्या आधारे सदर चोरीच्या घटना ह्या वसमत तालुक्यातील राहणारे महेंद्र भगवान करवंदे, राजू शेषराव पडोळे, राजू संभाजी करवंदे, अनिल उर्फ बंडू भागाराम खंदारे चौघेही रा. मुडी, रमेश उर्फ रमा सुरेश गायकवाड रा. गणेशपुर, सय्यद अलीम सय्यद मन्सूर, शेख अरबाज उर्फ अब्बू शेख सत्तार दोन्ही रा. बाभुळगाव, अमोल आनंदराव मल्हारे रा. पांगरा बोखारे यांनी मिळून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे आज रोजी तपास पथकाने अतिशय सीताफिने नमूद पैकी राजू करवंदे, अनिल उर्फ बंडू खंडारे, रमेश उर्फ रमा गायकवाड, सय्यद सलीम सय्यद मन्सूर, शेख अरबाज उर्फ अबू शेख सत्तार, अमोल मल्हारे या आरोपींना ताब्यात घेऊन तंत्रशुद्धपणे तपास व विचारपूस करता नमूद आरोपींनी एकत्र मिळून जिल्ह्यात शेतमाल धान्य चोरीचे एकूण आठ गुन्हे केल्याचे उत्पन्न झाले.
नमूद आरोपींकडून तपासात वरील गुन्ह्यातील एकूण चोरून नेलेले हळदीचे 35 कट्टे वजन 17.5 क्विंटल किंमत एक लाख 16 हजार 600 रुपये सोयाबीनचे 34 कट्टे वजन 17 क्विंटल किंमत 85 हजार रुपये व मुद्देमाल विकून मिळवलेले नगदी दहा हजार रुपये असा एकूण दोन लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस अंमलदार भगवान आडे, राजूसिंग ठाकूर, विठ्ठल काळे, सुमित टाले, आकाश टापरे, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.