मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जातीय सलोखा व सामाजिक सद्भावना अंतर्गत सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रमाचे 6 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात शांतता नांदली पाहिजे, सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकमेकांबद्दल आदर व सन्मान बाळगून जातीय व सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनास मदत करावी या व्यापक हेतूने हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात जातीय सलोखा व सामाजिक सद्भावना हा उपक्रम जिल्हा पोलीस दलाकडून राबविला जात आहे. यापूर्वी सदर उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस दलाकडून कौमी एकता चषक क्रिकेट स्पर्धेचे व्यापक प्रमाणात आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत सर्व धर्मातील खेळाडू युवकांच्या समावेशाने सदर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. सदर उपक्रमांतर्गत सर्व धर्माची एकच शिकवण हा कार्यक्रम 6 ते 27 फेब्रुवारी या दरम्यान जिल्हा पोलीस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 13 ही पोलीस ठाण्यांमध्ये सदर उपक्रमांतर्गत पुढील 20 दिवस या विषयाला अनुसरून जिल्हा पोलीस दलाकडून व्याख्यान, वृक्षारोपण, रक्तदान, शिबिर तसेच शाळा, महाविद्यालय स्तरावर वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.
6 फेब्रुवारी रोजी स्व. शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, हिंगोली पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, विविध धर्मातील धर्मगुरू व प्रमुख मार्गदर्शक खुशालचंद महाराज प्रो. भन्तेजी सुमेध बोधी, मौलाना मुक्ती शफिक, फा. जितेन डेरीस, डॉ. निलावार, प्रा. जावळे, प्रा. जायभाय, प्रा. मुलगीर व प्रा. बलखंडे इतर धर्मातील प्रतिष्ठित नागरिक शांतता कमिटीचे सदस्य तसेच पत्रकार बांधव हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यानंतर प्रा. बलखंडे यांनी स्वागताचे गीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी केले.
सदर सर्व धर्माची एकच शिकवण कार्यक्रम घेण्यामागील भूमिका व महत्त्व यावेळी त्यांनी विषद केले.
कार्यक्रमास उपस्थित प्रा. जायभाय जावळे, मुलगीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर मंचावर उपस्थित धर्मगुरूंनीही राष्ट्रीय एकता सर्वधर्मसमभाव याबाबत अमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पृथ्वी वाढवे या विद्यार्थिनीनेही स्वतः रचलेल्या गीताचे गायन करून सर्वांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निलावार यांनी केले तर पोलीस निरीक्षक कचवे यांनी उपस्थित आमचे आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.