मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / सतीश खिल्लारी :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील दूरचुना ते जांभरून तांडा रोड ची अवस्था अत्यंत वाईट झाली असून रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक व प्रवाशांचे खराब रस्त्यामुळे अतोनात हाल होत आहेत. तर या रस्त्यावरून हिंगोली अथवा औंढा नागनाथ येथे दवाखान्यात प्रसुतीसाठी जाणाऱ्या गर्भवती मातांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्यासह इतर आजाराचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील दूरचुनाते जांभरुण तांडा हा रस्ता दुर्गम भागातील अनेक गावांना जोडला गेलेला आहे. तसेच पुढे हा रस्ता सेनगाव तालुक्यात जाऊन तालुक्यातील काही गावांना जोडला गेलेला आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावरून सेनगाव तालुक्यातील आढळसह इतर गावातील ग्रामस्थांची ही येजा असते. मात्र सदरील रस्त्याची सद्यस्थितीत अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे.
रस्त्यावरचे डांबर निघून मोठ्या प्रमाणात गीती उघडी पडली आहे. तसेच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांचे छोटे – मोठे अपघात घडत आहेत. यात वाहनधारकांना इजा पोहोचून वाहनाचेही मोठे नुकसान होत आहे.
रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांचे खराब रस्त्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. रस्त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झालेली असताना संबंधित रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
सदरील रस्त्यावरून प्रसुतीसाठी हिंगोली अथवा औंढा नागनाथ येथील दवाखान्यात जाणाऱ्या गर्भवती मातांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास अपघात तसेच एखाद्या गर्भवती मातेच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे सदरील रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा अशी मागणी दूरचुना, जांभरून तांडा तसेच रस्त्यावरील इतर गावातील ग्रामस्थांतून तसेच वाहनधारक, प्रवाशांतून केली जात आहे.