मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. खंड न पडता व्याख्यानमालेचे हे सलग 17 वे वर्ष आहे. सलग सतराव्या वर्षी बुद्धिजीवी व चळवळीतील व्यक्तींसह समाज बांधवांसाठी वैचारिक पर्वणी ठरणार आहे.
हिंगोली येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या हस्ते गुंफले जाणार आहे. यामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. सुकुमार कांबळे (सांगली) हे ‘क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीतील योगदान’ या विषयावर मांडणी करणार आहेत.
या सत्राचे अध्यक्ष म्हणून हिंगोली येथील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. अमोल धुमाळ हे असून उद्घाटक म्हणून सामाजिक विचारवंत बालाजी थोटवे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून लहुजी साळवे कर्मचारी महासंघ नांदेड जिल्हा अध्यक्ष संजय मोरे यांची उपस्थिती राहणार आहे.
18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता द्वितीय पुष्प गुंफले जाणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध लेखक, संशोधक, प्रा. डॉ. सोमनाथ कदम हे उपस्थित राहणार आहेत. ते ‘साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर मांडणी करणार असून अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश पांडुरंग खिल्लारी हे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटक म्हणून नरसिंग घोडके हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार नामवाड यांची उपस्थिती राहणार आहे.
व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प एकोणावीस फेब्रुवारी रोजी गुंफले जाणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून आश्लेषा जाधव (प्रसिद्ध व्याख्यात्या, मुंबई) ह्या असून त्या ‘परिवर्तनवादी चळवळीतील महानायक व महानाईका व सद्यस्थिती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी हरिभाऊ सोनुने ह्या उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून हिंगोली येथील अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील ह्या उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहे.
या व्याख्यानमालेस शहरातील सर्व बुद्धिजीवी व चळवळीतील व्यक्तींसह मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने करण्यात आले आहे.