मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्य मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या 11 सोशल मीडिया वापरकर्त्यांवर हिंगोली येथील सायबर सेल विभागाकडून कार्यवाही करण्यात आले आहे. या वापरकर्त्यांचे सोशल मीडिया अकाउंट पेज बंद करण्यात आले आहेत.
हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये. त्यावर प्रतिबंध व्हावा. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीस आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.
सदरील पथकात अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पवार, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्तात्रय नागरे, रोहित मुदीराज, इरफान पठाण, दीपक पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदरील सायबर सेल विभागाने मागील आठवड्यात 6 ते 13 फेब्रुवारी या दरम्यान आक्षेपार्य मजकूर पोस्ट करणाऱ्या फेसबुक 2 व इंस्टाग्राम 9 अशा एकूण 11 सोशल मीडिया वापरकर्त्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वय नोटीस देऊन त्यांचे सोशल मीडिया पेज अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
अशा प्रकारे जाती धर्मात तेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वय गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून असे कृत्य करणाऱ्यांची जेलवारी अटळ असल्याचे जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.
कळमनुरी येथे विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक व गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शन
हिंगोली सायबर सेलच्या पथकाने कळमनुरी येथील संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व कोचिंग क्लासेस तसेच अभ्यासिका येथे जाऊन विद्यार्थी व शिक्षक वर्गात सायबर सेक्युरिटी तसेच सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनोळखी एप्लीकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू नये. असे केल्यास आपल्या मोबाईल मधील डाटा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन केले.
तसेच विविध विषय जसे की सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करू नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मैत्री स्वीकारू नका, आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका, अशा प्रकारे सायबर बाबत माहिती दिली.
व्हाट्सअप तसेच फेसबुक वर येणारे अनोळखी महिलांचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका, याद्वारे आपले आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशाप्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेल हिंगोली येथे संपर्क करावा. नागरिकांनी ऑनलाइन होणारे व्यवहार काळजीपूर्वक करावेत.
तसेच आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी केले आहे.