मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील वाटर फिल्टर गावकऱ्यांना पाच रुपयात शुद्ध पाणी देण्याबरोबरच भानखेडा सरपंच व ग्रामसेवक यांना आर्थिक फायदा देऊ लागले आहे. सरपंच व ग्रामसेवक हे आपल्या सोयीनुसार याचा फायदा करून घेत असल्याचे निवेदन उपसरपंच सिद्धार्थ वाकळे यांनी सेनगाव गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना लागलाय. थंडी दूर होऊन उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. येत्या काळात जिल्हा परिषद व नगरपरिषदांकडून पाण्यावर मात करण्यासाठी कृती आराखडे सादर केले जातील, मात्र सर्वसामान्यांना यातून किती प्रमाणात फायदा होतो.
अद्याप त्यांना खरोखर मुबलक प्रमाणात या कृती आराखड्यातून पाणी उपलब्ध होते का हे पाहिले जात नाही, मात्र कृती आराखडे तयार होतात. यातून अधिकाऱ्यांचेच आणि संबंधितांचे भले होते. चौदाव्या वित्त आयोगातून केलेली कामे तर अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेले उदाहरण आहेत या निधीतून (अंदाज) भानखेडा या गावास वाटर फिल्टर प्राप्त झाले होते.
भानखेडा ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत असलेल्या वाटर फिल्टर मशीन मध्ये 5 रुपये टाकून सध्या पाणी ग्रामस्थांना मिळत आहे, परंतु मागील दोन वर्षापासून संबंधित फिल्टर मशीन मध्ये सर्वसामान्य नागरिकांनी टाकलेल्या पैशाचा कोणताही हिशोब ग्रामपंचायत कार्यालयाने ठेवलेला नाही.
फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी कधी ग्रामसेवक तर कधी सरपंच आपल्या गरजेनुसार वापर करतात व आपली आर्थिक टंचाई दूर करतात. अशा प्रकारे सरपंच, ग्रामसेवक यांनी सर्वसामान्य ग्रामस्थांच्या पैशाचा संगणमत करून अपहार केला आहे.
त्यामुळे भानखेडा सरपंच ग्रामसेवक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी अन्यथा भानखेडा ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही उपसरपंच सिद्धार्थ वाकळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर भानखेडा ग्रामपंचायत कार्यालयाचे उपसरपंच सिद्धार्थ वाकळे यांची स्वाक्षरी आहे.
दोन वर्षांपासून हिशोब नाही
सेनगाव तालुक्यातील भानखेडा या गावात अंदाजे 2017 मध्ये 14 व्या वित्त आयोगातून वाटर फिल्टर यंत्र प्राप्त झाले होते. पाच रुपये टाकून येथील ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळत होते, मात्र तेव्हा मशीनमध्ये टाकलेल्या पाच रुपयांचा हिशोब ठेवण्यात येई मात्र मागील दोन वर्षांपासून या पैशांचा हिशोब ठेवला जात नाहीये. त्यामुळे या मशीन मधील पाण्यासारखा पैशांचे केले काय असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.