मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याला 7 मार्च रोजी मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सोसाट्याच्या वाऱ्याने तसेच जिल्ह्यातील काही भागांना गारपीटीचाही फटका बसला आहे. यामध्ये रब्बी पिकांसह मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यावर मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे ढग येत होते. 6 मार्च रोजी जिल्ह्यात होळी हा सण अवकाळी ढगांच्या गर्देत साजरा झाला.
मात्र, 7 मार्च रोजी मध्यरात्री सुमारे साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान पासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी ढगांच्या गडगडाटासह आकाशात विजांचा लखलाखातही होता. सुदैवाने जिल्ह्यात कुठेही वीज पडल्याची वार्ता नाही.
मात्र, जिल्ह्यातील काही भागांना गारपिटीचा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील गहू ज्वारी हरभरा या उशिरा लावलेल्या पिकांना फटका बसला आहे.
तसेच संत्री, मोसंबी, आंबा, चिकू या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सदरील फळे शेतात सर्वत्र पडून विखुरल्याचे चित्र होते. झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सदरील अवकाळीने शेतकऱ्यांना धुलीवंदन नाही तर ‘शिमगा’ साजरा करावा लागला. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.