मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – समाज माध्यमावर आक्षेपार्य पोस्ट करून जाती धर्मात व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या एकूण 7 फेसबुक वापरकर्त्यांवर हिंगोली येथील सायबर सेल विभागाने कारवाई करत त्यांचे अकाउंट सील केले आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये, त्यावर प्रतिबंध व्हावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.
सदर पथकात अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पवार, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्तात्रय नागरे, रोहित मुदीराज, इरफान पठाण, दीपक पाटील यांची नेमणूक केलेले आहे.
या पथकाने 13 ते 19 मार्च या दरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या एकूण 7 फेसबुक वापरकर्त्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 नोटीस देऊन सोशल मीडिया पेज अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया केली आहे.
अशा प्रकारे जाती – धर्मात तेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इसमावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वय गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून असे कृत्य करणाऱ्यांची जेलवारी अटळ असल्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.
कनेरगाव बस स्थानक, हिंगोली येथे मार्गदर्शन
हिंगोली सायबर सेलच्या पथकाने कनेरगाव नाका बस स्थानक हिंगोली येथे जाऊन विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी तसेच सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनोळखी एप्लीकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू नये. असे केल्यास आपल्या मोबाईल मधील डाटा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन केले.
तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करू नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मैत्री स्वीकारू नका, आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका, अशा प्रकारे अनेक विषयाबाबत माहिती दिली.
अनोळखी महिलांचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका
व्हाट्सअप तसेच फेसबुक वर येणारे अनोळखी महिलांचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका. याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेल हिंगोली येथे संपर्क करावा. नागरिकांनी ऑनलाईन होणारे व्यवहार काळजीपूर्वक करावे. तसेच आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे आवाहन डॅशिंग पोलिस अधीक्षक जे श्रीधर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी केले आहे.